Feeds:
Posts
Comments

Archive for October, 2008

सावली

मागे एकदा श्रीवर्धनला गेलो असतांना किनार्‍यावर मस्त वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर सावलीच्या माध्यमातून विरह मांडण्याची कल्पना सुचली. ती हुरहुर शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न!!

भारलेली रात्र सारी चंद्र आहे संगती,
गारवेला गार वारा वाहतो सभोवती,
पारिजाता पालवीची आस आहे लागली
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी,
गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी,
हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

गाज येई सागराची धुंदल्या तालावरी,
बोल सारे रेखणारी लाट होई बावरी,
त्या किनार्‍याच्या शिवारी प्रेमवीणा गूंजली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

राघव

Advertisements

Read Full Post »

या दोन्ही कविता मी बर्‍याच आधी लिहिलेल्या आहेत. माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन पहिल्या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केलेला. सोबतची दुसरी कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असावी. किंचित बदल करून येथे प्रकाशीत करतोय.
आज तो सावरलाय पण त्यावेळचा त्रास सहन करणे त्याच्या सहनशक्ती पलिकडचे झालेले होते.

कसे रोधावे मनास, कसा सांभाळावा ध्यास..
मिणमिणता उजेड अन् अंधाराची कास.

दुःख सर्वत्र गर्दले, कोण कुणाचे कळेना..
तुझ्या सोबतीच्या जागी, दगा करतोय वास.

कसे अफुट उठले दव काळजाच्या पानी..
डोळे आटलेले तळे, थिजे विश्वासाचा श्वास.

दिन-रात एक सारे, विश्व निमाले क्षणात..
काळ थांबला कधीचा, नुरे जगण्याची आस.

————————————-

मनी तेवतो प्रकाश, त्याला ग्रहण कशाचे?
मन आनंदस्वरूप, दुःख केवळ आभास.

प्रेम सांगेल तुजला पुन्हा प्रेमाची महती..
घाव पेलण्या दग्याचा जणू घडला अभ्यास.

वेड्या, वादळ निमाले, पुन्हा बांधूया डोलारा..
मायबापाच्या कुशीत पुन्हा अंकुरेल श्वास.

काळ थांबतो कधी का? त्याचा अनंत प्रवास..
फक्त, क्षणैक केवळ, तुला झालेला ‘तो’ भास.

राघव

Read Full Post »