Feeds:
Posts
Comments

Archive for November, 2008

ज्ञानाचीया डोहा
जाऊ मी कशास,
चरणांची आस
मजलागी |

माऊलीचे प्रेम,
झरा करुणेचा,
गारवा कृपेचा,
पुरेसाहे |

नका घेवू आता
दासाची परीक्षा,
तीच गोड भिक्षा
मज द्यावी |

तुम्हा माझी आण,
पुरवा तहान,
दर्शनास प्राण
व्याकूळले |

राघव

Read Full Post »

ऋण मातीचे कसे विसरले? कुठे सोडली लाज मुलांनी?
पैशाच्या माजात गोठती श्वास कोवळे कणाकणांनी..

का अब्रुचे धिंडवडे अन् देहाचे बाजार निघावे?
व्यापाराचा बाज निराळा, पाप जोडती मणामणांनी..

चहुबाजूंना कोंदटलेली डबकी-नाल्या-उघडी गटारे,
एक झराही दुर्लभ झाला, घाण पसरते मणामणांनी..

वाट कुणाची बघतो आपण? स्वयंप्रेरणा कुठे निमाली?
मशाल जळावी प्रत्येकाची अज्ञानाच्या कणाकणांनी..

पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी,
घाव घालण्या दगडांवरती देह झिजावा कणाकणांनी..

शिवरायांची माती अपुली प्राण शिंपुनी मान* धरावा,
मातीमधुनी फुलत उठावे जीवन अपुले कणाकणांनी..

राघव
[*मान: अभिप्रेत अर्थ – अभिमान]

Read Full Post »

आज सकाळ पासूनच सतत विठ्ठलाची मुर्ती डोळ्यांपुढे येत होती. म्हटले आज आपल्या हातून माय काहीतरी लिहून घेणार.. नक्की!
तशा २-३ ओळी काल-परवा कडेच मला सुचल्या होत्या पण लिहून काढल्या नव्हत्या! आज मात्र दिवसभरात येवढे लिहून झाले माझ्याकडून.. भगवंताचीच कृपा.. नाही? Smile

मला भावतो गजर तुझ्या नामाचा-प्रेमाचा..
तुझ्या सगुण रुपात मला निर्गुणाची ओढ!

काय वर्णावे तत्वांस साधे रूप वर्णवेना!
माझ्या डोळ्यांत मावतो प्रेम-अश्रुंचा सागर..

कुणा तुझ्यात दिसतो सार्‍या विश्वाचा नियंता..
कुणी तुझ्यात पाहतो काळा दगड केवळ!!

तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच!
सार्‍या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर!

माय-बाप रघुवीर माझी विठ्ठल माऊली..
तिच्या चरणांशी माझे मन आनंदी, अचळ!

राघव

Read Full Post »